पोलीस लाठीचार्जमध्ये भाजप नेत्याचा मृत्यू, लोकशाहीची आठवण करुन देत फडणवीसांनी व्यक्त केला संताप

पाटणा- बेरोजगारी आणि भ्रष्टाचार भंगाच्या मुद्द्यावरून गुरुवारी (13 जुलै) विधानसभेला घेराव घालण्यासाठी बाहेर पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जहानाबाद जिल्हा सरचिटणीस विजय कुमार सिंह (Vijay Kumar Singh) यांचा मृत्यू झाला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राधामोहन शर्मा यांनी विजय कुमार सिंह यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. याशिवाय लाठीचार्जमध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भाजपने तीव्र संताप व्यक्त केला असून कार्यकर्त्याच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही शोक व्यक्त केला आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलिसांनी जहानाबाद जिल्हा सरचिटणीस विजय कुमार सिंह यांच्या डोक्यावर लाठीमार केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने तारा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यानंतर पीएमसीएच रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या वृत्ताने राजकीय वातावरण तापले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नितीश सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, भाजप पदाधिकाऱ्याच्या निधनाबद्दल शोकही व्यक्त केला.

बिहारमध्ये राज्य सरकारने केलेल्या निर्दयी लाठीचार्जमध्ये आमच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. ज्या भूमीवरुन लोकशाहीचा आवाज बुलंद झाला, त्याच भूमीवर अधिकारशाही निती वापरली जात असल्याचा मी निषेध करतो. भाजपा सरकारने आपला नाकर्तेपणा लपविण्याचे लाख प्रयत्न करावे, पण भाजपा आपला संघर्ष सुरूच ठेवेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन म्हटले आहे.