आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला हायकोर्टाचा दणका

मुंबई – राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टला मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. मुंबईतल्या पवई तलाव परिसरातील महापालिकेकडून होत असलेलं सायकल ट्रॅकचं बांधकाम बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा हायकोर्टाने दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि बी.जी. बिश्त यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पवई तलावाजवळ सुरू असलेले सायकलिंग व जॉगिंग ट्रॅकचे काम बेकायदेशीर आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने संबंधित परिसर पूर्ववत करण्याचे आदेश दिले. कायद्याच्या दृष्टिकोनातून सायकलिंग ट्रॅकचे काम बेकायदेशीर आहे आणि महापालिकेला भरावाचे काम करण्यास मनाई करण्यात येत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.सायकलिंग ट्रॅकमुळे पवई तलावातील मगरींना त्याचा त्रास होईल म्हणून काही स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते न्यायालयात गेले होते. या याचिकेवर सुनावणी करत असताना हायकोर्टाने महापालिकेतर्फे होणारं हे बांधकाम अवैध असल्याचा निर्णय दिला आहे.

पवई तलावाजवळ सायकलिंग आणि जॉगिंग ट्रॅक उभारण्याच्या पालिकेच्या प्रकल्पाला आयआयटीचा विद्यार्थी ओंकार सुपेकर व सामाजिक कार्यकर्ते डी. स्टॅलिन यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकल्पात ‘सछिद्र तंत्रज्ञान वापर’ करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अडवला जाणार नाही, असा युक्तिवाद करत पालिकेने ही याचिका फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली होती.