‘छेडेंगे तो छोडेंगे नही’ म्हणणारा PFI नेता फरार, मनसेला दिली होती धमकी

मुंबई – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले. सोबतच राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय.

राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

न्यायालयाच्या निकालाचे पालन सर्वांनी करायलाच हवे असं त्यांनी सांगितले आहे.यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या मुस्लिम संघटनेने एक इशारा दिला होता.  देशातील मुस्लिमांवर अत्याचार होत असून काही लोकांना मुंब्य्रातील वातावरणही बिघडवायचं आहे, असं पीएफआयचा मुंब्रा अध्यक्ष मतीन शेखानी (Matin Shekhani) म्हणाला होता. तसंच यावेळी त्याने ‘छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं’, असा नारा दिला. जर तुम्ही महाराष्ट्रातील एकाही लाऊडस्पीकरला (Loudspeaker) हात लावलात तर तुमचा विरोध करण्यासाठी PFI सर्वात पुढे दिसेल, असा इशारा त्याने दिला होता.

वादग्रस्त विधानानंतर मतीन शेखानी हा फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी शोध मोहीम राबवली आहे. मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) मतीनच्या मुंब्रा परिसरातील घरात आणि कार्यालयात तपास केला, मुंब्रा पोलिसांची दोन पथके मतीनचा शोध घेत आहेत.मुंब्रा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मतीनला लवकरच अटक करण्यात येईल. विनापरवाना गर्दी जमवल्याचा त्याच्यावर आरोप असल्याचे पोलिसांचं म्हणणे आहे. मात्र अटकेनंतर मतीनवर दाखल गुन्ह्यात कलमे वाढू शकतात.