जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यावर रुपाली पाटील कडाडल्या, म्हणाल्या, निर्लज्ज सरकार…

ठाणे – राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका महिलेने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केल्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे. या घडामोडीनंतर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे की, पोलीसांनी माझ्या विरुद्ध 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही 354. मी या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या.. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत.

दरम्यान, या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही यावर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, यंत्रेचा गैरवापर,हिटलरशाही सरकार ED सरकारचा जाहीर निषेध. तुमचे मंत्री गुलाब पाटील,अब्दुल सत्तार यांनी महिलांना शिवीगाळ केली त्यावर गुन्हा दाखल नाही आणि कार्यक्रमात गर्दीत महिलेला बाजूला केले म्हणून जितेंद्र भाऊ आव्हाड यांच्यावर गुन्हा वा रे वा निर्लज्ज,लोकशाहीचा खून करणारे सरकार असं त्यांनी म्हटले आहे.

नेमकं काय घडलं ?

मुंब्रा येथील उड्डाणपुलाचा हा सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या दिशेने रवाना झाले. मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित एका महिलेने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि ती महिला हे आमने-सामने आले आले. यावेळी आव्हाडांनी त्यांना बाजूला केले आणि आपला मार्ग मोकळा करून पुढे निघून गेले. आव्हाड यांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून ‘काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो’ असे म्हणत ढकलल्याचा आरोप करत त्या महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत आव्हाडांविरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला.