अजित पवारांना गद्दार म्हणणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जिथे पक्षाचा प्रश्न येईल तिथे…”

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याप्रमाणेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करत काल शिवसेना-भाजपशी हात मिळवला. राजभवन येथे आपल्या ९ समर्थकांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या भूमिकेवर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या अजित पवारांबद्दल वक्तव्य केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यावर विरोधकांनी ५० खोके, गद्दार अशा उपाध्यांनी शिंदे व त्यांच्यासह गेलेल्या आमदारांवर टीका केली होती. तर आता अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने त्यांनाही गद्दार म्हटले जाणार का असे प्रश्न अनेकजण करत आहेत. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. २०१९ ते २३ या चार वर्षात आता माझ्यावरही थोडी जबाबदारी आणि मॅच्युरिटी आली आहे. आपलं प्रोफेशनल काम व नाती यांच्यात गल्लत करायची नाही हे मला माहित आहे.”

“माझं आणि दादाच भांडण होऊच शकत नाही कारण दादाविषयी माझ्या मनात प्रेमच होतं आणि राहील, दादा माझा मोठा भाऊ आहे, इतक्या वर्षात मी त्याच्याशी कधी वाद घातला नाही आणि कधी घालणारही नाही, जेव्हा आमच्या नात्याचा विषय असेल तेव्हा. बाकी जेव्हा पक्षाचा विषय असेल तेव्हा ते आमचं प्रोफेशनल काम आहे. त्यात मी पर्सनल व प्रोफेशनल गल्लत करणार नाही. बाकी पुढे काय होईल ते बघू ही काही इन्स्टंट कॉफी नाही,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.