ही पवारांचीच खेळी, उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य नाही; राज ठाकरेंची प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करत काल शिवसेना-भाजपशी हात मिळवला. राजभवन येथे आपल्या ९ समर्थकांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या भूमिकेवर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ही सर्व शरद पवार (Sharad Pawar) यांची खेळी असल्याचे म्हणत टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीतील फूट आणि अजित पवार यांच्याबद्दल राज ठाकरे म्हणाले, ”एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पवार साहेब कितीही, काहीही म्हणत असले की, त्यांचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही. तरी, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे नेते असेच पाठवल्याशिवाय जाणार नाहीत. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरीही मला आश्चर्य वाटणार नाही.”

‘आपण हा सगळा ड्रामा पाहत आहोत. याची सुरुवात पहाटेच्या शपथ विधीने झाली, मग शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी झालं, आता शत्रू कोण आणि मित्र कोण याचं काही महाराष्ट्रात राहिलंच नाही. मी मेळावा घेऊन त्यावेळी बऱ्याच गोष्टी बोलेन.” असेही राज ठाकरेंनी म्हटले.