वीर जवान तुझे सलाम : अवघ्या 22 व्या वर्षीच साताऱ्याच्या सुपुत्राला अतिरेक्यांशी लढताना वीरमरण

Satara – सीमा सुरक्षा दलात (Border Security Force) कार्यरत असलेले बामणोली (Bamnoli) येथील जवान प्रथमेश संजय पवार (Prathmesh Sanjay Pawar) जम्मू-काश्‍मीरमध्ये (Jammu and Kashmir) कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव उद्या रविवारी गावी येणार असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. ते तीन महिन्यांपूर्वीच सैन्यात भरती झाले होते.

प्रथमेश यांनी आपलं प्राथमिक शिक्षण बामणोली तर्फ कुडाळ येथे पूर्ण केलं. त्यानंतर बारावीपर्यंत शिक्षण त्यांनी पाचवड येथील विद्यालयामध्ये पूर्ण केलं. त्यानंतर सैन्यदलात त्यांचे सिलेक्शन झाले. सैन्यदलात दाखल होऊन तीन महिने झाले असतानाच देशसेवा बजावताना वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी प्रथमेश यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव उद्या रविवारी बामणोली तर्फ कुडाळ गावी येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शहिद प्रथमेश यांचे मावसभाऊ अमोल गंगोत्रे (रा. बामणोली तर्फ कुडाळ) यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, 19 मे रोजी रात्री जवान प्रथमेश पवार हे जम्मू सांबा ब्लॉक परिसरात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी अचानक दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतानाच प्रथमेश यांना गोळी लागली. यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याची माहिती त्यांच्या घरी दूरध्वनीवरून सेना दलातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.