“राजकारणात लोकांना संभ्रमात ठेवणं ही शरद पवारांची हातोटी, पण आता त्यांनाच अजित पवार संभ्रमात ठेवतात”

सोलापूर- गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर स्वतः अजित पवारांनी या चर्चांना पूर्णविराम देत आणि आपण जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्या चर्चा अजूनही कुठे ना कुठे सुरू आहेत. अशातच आता राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी “अजित पवार शरद पवारांनाच संभ्रमात ठेवतात”, असे मोठे वक्तव्य केले आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

“मला अजित पवारांबाबतचा एक प्रश्न विचारण्यात आला होता. मी कालही त्याचं उत्तर दिलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे ज्येष्ठ नेते आहेत. राजकारणात लोकांना संभ्रमात ठेवणं ही त्यांची हातोटीच आहे. आता त्यांना अजित पवार संभ्रमात ठेवतात यापेक्षा कोणती मोठी गोष्ट असू शकते” असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.