जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा, अजिंक्य रहाणेला संधी

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी (WTC Final) भारताने संघ जाहीर केला आहे. या संघात माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) संधी मिळाली आहे. संघाची कमान रोहित शर्माकडे आहे तर केएस भरत यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. केएल राहुल आणि जयदेव उनाडकट यांनीही १५ सदस्यीय संघात आपली जागा कायम राखण्यात यश मिळवले आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ७ ते ११ जून दरम्यान लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. या मोठ्या सामन्यासाठी १२ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी (INDvsAUS) होणार आहे.

संघात ६ अनुभवी फलंदाज आणि ५ वेगवान गोलंदाज
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघात यष्टीरक्षक केएस भरत व्यतिरिक्त ६ प्रमुख फलंदाज असतील. त्याचबरोबर भारताच्या या संघात ५ वेगवान गोलंदाजांना स्थान मिळाले आहे. तर ३ फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे, ज्यात दोन डावखुरे आहेत.