सत्तेची मस्ती डोक्यात गेली आहे का? अजित पवार सरकारवर बरसले

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रखडलेलं पावसाळी अधिवेशन बुधवारपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपणार हे काही वेगळं सांगायला नको. यातच आज विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला आहे.

अजित पवार यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते या भूमिकेतून आज विरोधकांची बाजू पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर टीका केली. तसेच, त्यांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेताना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित शासकीय चहापानावर विरोधक बहिष्कार टाकत असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं.

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी संतोष बांगर प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केलं. संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी सोमवारी हिंगोलीतील एका मध्यान्न भोजन केंद्रावरील निकृष्ट दर्जाच्या जेवणाचा मुद्दा उपस्थित करत संबंधित केंद्राच्या व्यवस्थापकालाच कानशिलात लगावली. तसेच, “मला टीकेची पर्वा नाही, लोकांसाठी कायदा हातात घ्यायला मी तयार आहे”, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर “सत्तेची मस्ती डोक्यात गेली आहे का?” असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांनी राज्य सरकार आणि संजय बांगर यांना देखील सुनावलं.