रेल्वेची सर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येणार – रावसाहेब पाटील दानवे 

पुणे –  केंद्रीय राज्यमंत्री रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे (Raosaheb Danve) यांनी पुण्यातील लोकप्रतिनिधींसोबत आज बैठक घेतली. पुणे रेल्वे (Pune Railways) विभागात सुरू असलेली विकासकामे, प्रवाशी सुविधा, पुणे-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि रेल्वे विद्युतीकरण परियोजना, पायाभूत सुविधांची कामे, रेल्वे सेवा, गाड्यांना स्टॉपेज देणे, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करताना भू संपादन संबंधी मुद्दे, लेवल क्रासिंग गेट च्या आसपास पावसाळ्यात पाणी जमा होण्याची समस्या, रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण होण्याची समस्या आदींबाबत रेल्वे राज्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा (Divisional Railway Manager Renu Sharma) यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींचे स्वागत केले.या बैठकीला रेल्वेच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीला संबोधित करताना रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी पुणे रेल्वे विभागात  सुरू असलेल्या विकासकामांबाबत सद्य परिस्थितीवर प्रकाश टाकला.बैठकीस उपस्थित मान्यवर लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील विकासकामांना गती देण्यावर भर दिला तसेच प्रवाशी सुविधा वाढविणे,रेल्वे प्रकल्पात येणारे अडथळे याबाबत  देखील मत मांडले व सूचना केल्या.

यावर रेल्वे राज्यमंत्री  दानवे म्हणाले की सध्या सुरू असलेली सर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येणार असून, जी कामे विभागीय, मुख्यालय स्तरावर करता येतील, ती मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून, जी कामे मंत्रालय स्तरावर आहेत,  त्यांवरही  उचित निर्णय  घेण्यात येईल. त्यांनी रोड ओवर ब्रिज (Road over bridge), रेल्वे भुयारी मार्ग (Railway subway) यांची  निर्माण कामे त्वरित करण्यावर जोर दिला.  रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले की, रेल्वेचे विकासाचे काम प्रगतीपथावर आहे, यामध्ये त्यांनी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.