गुरुवारी पद्मावती परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा

पुणे  : महावितरणच्या पद्मावती विभाग अंतर्गत पद्मावती उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचे मोठे पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बदलण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येणार असल्याने गुरुवारी (दि. ३०) सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पद्मावती, गंगाधाम, बिबवेवाडी, मार्केटयार्ड परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र पर्यायी व्यवस्थेच्या वीजपुरवठ्यात काही तांत्रिक बिघाड झाल्यास या भागातील वीजपुरवठा खंडित राहण्याची शक्यता आहे.

महावितरणच्या पद्मावती उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रॉन्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यामुळे तो बदलणे अत्यावश्यक झाले आहे. नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मर उपलब्ध झाला असून तो बसविण्याचे पूर्वनियोजित काम गुरुवारी (दि. ३०) सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी या उपकेंद्रातील २२ केव्ही उच्चदाबाच्या तीन वीजवाहिन्यांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

हा पर्यायी वीजपुरवठा दुरुस्ती कामाच्या कालावधीत सुरळीत राहण्यासाठी महावितरणकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु तांत्रिक कारणास्तव त्यात बिघाड झाल्यास मात्र त्यानंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत बिबवेवाडी ते गंगाधाम एम्पोरियम, आदिनाथ सोसायटी ते महावीर सोसायटी, कुमार सिद्धांचल, मार्केटयार्ड, महर्षीनगर, वसंतबाग सोसायटी, अटल सोसायटी, सिटी प्राईड परिसरात वीजपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात असा प्रसंग उद्भवल्यास वीजपुरवठा बंदच्या कालावधीत ग्राहकांनी सहकार्य करावे अशी विनंती महावितरणकडून करण्यात आली आहे.