‘एकटीला घेऊन 200 जणांनी मारलं, तिथे आमचे 50 जरी असते तरी पुरून उरले असते’

मुंबई – : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena UBT) पक्षाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांच्यावर काल (16 जून) ठाणेनजीक कळव्यात एका कार्यक्रमात अचानक काही स्थानिक महिलांनी हल्ला चढवत त्यांना मारहाण केली.  तुम्ही बाबासाहेबांचा अपमान केला आहे असं म्हणत काही महिलांनी त्यांच्यावर थेट हल्ला चढवल्याचा आरोप पौळ यांनी केला आहे.

ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अयोध्या पोळ यांना मारहाण हे नामर्दनगीचं लक्षण आहे. अयोध्या पोळ ही आणखी त्वेषाने लढेल. एकटीला घेऊन 200 जणांनी मारलं तिथे आमचे 50 जरी असते तरी पुरून उरले असते, असं अंबादास दानवे म्हणालेत.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया 
अयोध्या पौळ यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी  प्रतिक्रिया व्यक्त केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा. एका महिलेवर हल्ला झाला. विरोधी पक्षात आहे म्हणून हा हल्ला झाला. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात झाला. काय करतात पोलीस? हीच का तुमच्या शहरातील महिला कार्यकर्त्यांची सुरक्षा? हा माझा पोलीस आयुक्तांना सवाल आहे, असं राऊत म्हणाले. तिला फसवून कार्यक्रमाला बोलावलं आणि हल्ला केला. हा डरपोकपणा आहे, असा हल्लाबोलही तिने केला.