शिवसेनेने केली संभाजीराजेंची राज्यसभेची वाट बिकट

मुंबई : महापालिका निवडणुकीआधी राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुका जूनमध्ये होणार आहेत त्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यातच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Former MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना खुले पत्र लिहिले आहे. या पत्रातून संभाजी राजे यांनी सर्वच पक्षातील आमदारांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपल्याला मदत करावी असे आवाहन केले आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला  राज्यसभेसाठी शिवसेना सहावा उमेदवार देणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे. शिवसेनेच्या घोषणेने संभाजीराजेंना मोठा धक्का बसला आहे.कारण राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी सर्वपक्षीयांनी मला मदत करावी, असं आवाहन मागील आठवड्यात संभाजीराजेंनी केलं होतं.

त्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिसाद दिला होता. पण मंत्री परब यांनी राज्यसभेसाठी शिवसेना सहावा उमेदवार देणार असल्याची घोषणा करून संभाजीराजेंची राज्यसभेची वाट बिकट केली आहे.