गौतमीची परिस्थिती हलाखीची होती, तेव्हा दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नाही – अमोल कोल्हे

गौतमी पाटील (Gautami Patil) हा विषय सध्या चांगलाच तापला आहे. गेल्या काही दिवसांपासून गौतमीच्या आडनावावरुन वाद सुरू आहे. गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे असे म्हटले जात आहे. मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी गौतमीला तिचे पाटील आडनाव बदलण्याचा इशारा दिला आहे. तसेच ती तिच्या नावापुढे पाटील लावून पाटलांची बदनामी करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमोल कोल्हे गौतमीबद्दल बोलताना म्हणाले, ‘तिने लावणी नृत्यांगना म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. तिची क्रेझ निर्माण झाली आहे पण कलाक्षेत्रातील यश हे कायमस्वरूपी नसतं. आज तिच्याबाबतीत घडतंय ते प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत घडतंय. आज गौतमी यशाच्या शिखरावर आहे ती तिची कला सादर करत आहे. ते तिचं काम आहे. ती एक कलाकार म्हणून कला सादर करत आहे. तिला उगीच ट्रोल करण्यापेक्षा तिची कुचंबना होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.’

पुढे समाजातील ठेकेदारांना चार बोल सुनावत त्यांनी म्हटलं, ‘सध्या तिच्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी होतेय मात्र जेव्हा तिची परिस्थिती हलाखीची होती, प्रतिकूल होती तेव्हा दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नाही. आता ती तिच्या कर्तृत्वावर पुढे जातेय तेव्हा कुणाच्या पोटात दुखण्याची काय गरज?’