“अशा ‘कले’ला संरक्षण नको रे बाबा!”, गौतमी पाटीलबद्दल छत्रपती संभाजीराजेंचा बदलला सूर

गौतमी पाटील (Gautami Patil) हा विषय सध्या चांगलाच तापला आहे. गेल्या काही दिवसांपासून गौतमीच्या आडनावावरुन वाद सुरू आहे. गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे असे म्हटले जात आहे. मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी गौतमीला तिचे पाटील आडनाव बदलण्याचा इशारा दिला आहे. तसेच ती तिच्या नावापुढे पाटील लावून पाटलांची बदनामी करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणावर बोलताना संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी गौतमीच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली होती. परंतु त्यांनी आपल्या प्रतिक्रियेवरुन माघार घेतली आहे.

महिलांनी आपले गुण व कतृत्व दाखवायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. मराठा समाजातच नाही तर अनेक समाजातील लोक सुद्धा पाटील आडनाव लावतात, कलाकारांना सुरक्षा मिळायला पाहिजे, असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं होतं. आता संभाजीराजे यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून माघार घेतली आहे. त्यांनी नुकतंच एक ट्वीट करून म्हटलं आहे की, “अशा कलेला नको रे बाबा संरक्षण”.

गौतमी पाटीलवरील आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देणारं एक ट्वीट संभाजीराजे यांनी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, काल एका पत्रकाराने एका महिलेचा ‘कलाकार’ असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात आहेत असं म्हणत मला प्रतिक्रिया विचारली. मला त्या व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती. पण महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे समजून मी बोलून गेलो की कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे. मात्र आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची ‘कला’ मी बघितली. आता असे वाटत आहे, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण!