‘विठ्ठल मंदिरातील पंढरपुर मधील भोंगे खाली उतरले हे ऐकून वाईट वाटतय, हे पाप कुणाचं?’ 

मुंबई – राज्यात सध्या भोंग्यांचा मुद्दा  चर्चेत असून मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी यावरून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. सामान्य नागरिक, महिला, विविध पक्ष आणि संघटनांचा राज ठाकरे यांना पाठींबा मिळत असताना आता जुन्या शिवसैनिकांचा देखील राज ठाकरे यांना पाठींबा असल्याचे समोर येत आहे. याशिवाय कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्याच्या उद्देशाने अनेक मशिदींमध्ये भोंग्या शिवाय अजान ( Ajaan without bells in mosques ) दिली जात आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला आता हिंदू मंदिरांनी सुद्धा यात पुढाकार घेत भोंग्यांचा वापर बंद करण्याचे ठरविले असल्याचे दिसत आहे. अनेक मंदिरांमधून काकडआरती भोंग्यांचा वापर न करता केल्या जात आहेत. मात्र यावरून देखील आता राजकारण सुरु झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी ज्यांच्यावर हिंदू परंपरांची खिल्ली उडवल्याचा आरोप आहे त्यांनी या मुद्द्यावरून मनसेला लक्ष्य केले आहे.

आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, शिर्डी, पंढरपुर ,त्र्यंबकेश्वर या धार्मिक पिठावरून काकडा आरती बंद, ग्रामीण भागात १० नंतर किर्तन सेवा बंद. कोरोनानंतर आता कुठे अखंड हरिनाम सप्ताह, प्रवचन, किर्तन, सुरळीत सुरु झाली होती. यात्रा महोत्सव सुरु झाले. मात्र या धार्मिक वातावरणाला या भोंग्यांमुळे छेद गेला.

महाराष्ट्रात श्रावण, आषाढी, कर्तिकी या महिन्यात धार्मिक वातावरण असते. यानिमित्त ग्रामीण भागात वारकरी व इतर भजनाची परंपरा आहे. रात्री १० नंतर भोंग्याला परवानगी नसल्याने ही परंपरा मागे पडेल. पंढरपूर, तुळजापूर ही महाराष्ट्रातील शक्तीपीठे आहेत. चुकीच्या घाणेरड्या राजकारणामुळे हा फटका मुस्लिम,हिंदू व इतर धर्मियांनाही बसलाय . शेवटी विठ्ठल मंदिरातील पंढरपुर मधील भोंगे खाली उतरले हे ऐकून वाईट वाटतय. हे पाप कुणाचं? विचार करा.असं त्यांनी म्हटले आहे.