‘पुणे शहरात राष्ट्रवादी तिकीट वाटपात ओबीसींना सर्वसाधारण कोट्यातून त्यांच्या वाट्याची तिकिटे देणार’

पुणे – ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून (OBC Political Reservation) सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दणका दिला आहे. राज्य सरकारनं केलेला कायदा फेटाळत 15 दिवसांत निवडणुका जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) दिले आहेत.

सध्या जवळपास 14 महापालिका आणि 25 जिल्हापरिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ( Local Body Elections ) प्रलंबित आहेत. या निवडणुका 2020च्या जुन्या प्रभागरचनेनुसार, घेण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. वारंवार निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. तसंच राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावरही ताशेरे ओढले आहेत.

दरम्यान, आता या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप(NCP Pune City President Prashant Jagtap)  यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, आदरणीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य निवडणूक आयोगास ओ.बी.सी आरक्षणाशिवाय दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सर्वप्रथम सन्माननीय सुप्रीम कोर्टाचा आम्ही आदर  करतो. अर्थात अशा प्रकारचा निर्णय होणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अपेक्षित नव्हते. महाराष्ट्रातील ओ.बी.सी बांधवांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आग्रही भूमिका होती, आहे आणि यापुढेही राहील.

ओ.बी सी बांधवांना निवडणुकीतील राजकीय आरक्षण मिळावे यासाठी आमची सुरू असणारी लढाई यापुढे देखील सुरूच राहणार आहे. परंतु आज कोर्टाच्या निर्णयाचा मान राखत असताना निवडणुका कधी घ्यायच्या याबाबतचे सर्व अधिकार राज्य निवडणूक आयोगाचे आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने तत्काळ निवडणुका जाहीर केल्या, तर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज आहे.

कोर्टाने जरी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे जाहीर केले असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिकीट वाटपात ओ.बी.सी बंधु भगिनींना सर्वसाधारण कोट्यातून त्यांच्या वाट्याची तिकिटे देणार आहेत. ओ.बी.सी बांधवांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ न देण्याची काळजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेईल.असं जगताप म्हणाले.