मुलीचं नाव ठेवलं शिवसेना; स्वप्नात येऊन खुद्द बाळासाहेबांनीच नाव सुचवल्याचा शिवसैनिकाचा दावा

महाड : रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या एका कार्यकर्त्याने आपल्या मुलीचे नाव थेट शिवसेना असेच ठेवले आहे. यामुळे रायगड जिल्हयातील महाड येथे वाडकर कुटुंबाची सर्वत्र चर्चा आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून बाळासाहेबांचा कट्टर चाहता असलेल्या शिवसैनिकांने आपल्या लेकीचे नावच शिवसेना ठेवले आहे.

पांडुरंग वाडकर असं या शिवसैनिकाचं नाव आहे. ते विद्यमान उपसरपंच आहेत. १७ नोव्हेंबरला बाळासाहेबांचा स्मृतिदिन होता. या कन्येचा जन्मही १७ आक्टोबरला झाला हा योगायोग होता. तर मुलगी जन्माला यायच्या आदल्या दिवशी बाळासाहेब ठाकरे हे माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनीच आपल्या मुलीचं नाव शिवसेना ठेव असं सूचवलं आणि म्हणूनच मी माझ्या मुलीचं नाव शिवसेना असं ठेवले असं पांडुरंग वाडकर यांनी सांगितलं.महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.