अनामिका बनली फातिमा; मुस्लीम तरुणाशी निकाह केल्याने कुटुंबियांनी लेकीचे जिवंतपणीच केले पिंडदान

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका हिंदू मुलीचा मुस्लिम तरुणासोबत विवाह कुटुंबीयांना इतका संतापजनक होता की, त्यांनी ती जिवंत असतानाच तिचे पिंडदान केले आणि जेवणही ठेवले. हे प्रकरण आमखेरा परिसरात राहणाऱ्या मुलीशी संबंधित आहे.

अनामिका दुबे नावाच्या मुलीने मोहम्मद अयाज नावाच्या तरुणाशी लग्न केले आणि स्वतःचे नाव उज्मा फातिमा ठेवले होते. मुलीच्या या निर्णयाने संपूर्ण कुटुंब प्रचंड संतापले आणि त्यांनी मुलीला आयुष्यभर विसरावे या हेतूने तिचे पिंडदान करून टाकले. यासाठी नातेवाईकांनी शोकसंदेशांचे वाटप करून पिंडदान सोहळ्याचे आयोजन करून लोकांना आमंत्रितही केले होते.

शोकसंदेशात काय लिहिले होते?
कुटुंबाच्या वतीने नातेवाईकांना वितरित करण्यात आलेल्या शोकसंदेशात मुलीचे वर्णन एक कुपुत्री असे करण्यात आले होते. शोकसंदेशात असे लिहिले होते की, अत्यंत दुःखाने कळविण्यात येते की, अनामिका दुबे यांचे २ एप्रिल रोजी निधन झाले आणि तिचे ११ जून रोजी पिंडदान केले जाईल. कुटुंबीयांनी शोकसंदेशात त्यांच्या मुलीचा नरक गामिनी असा उल्लेख केला.

अनामिकाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या गवारी घाटावर पिंडदान विधी आयोजित करण्यात आला होता. अनामिका ही त्यांच्या घरात सर्वात प्रिय होती आणि तिचे संगोपनही चांगल्या पद्धतीने झाले होते, मात्र तिने आंतरधर्मीय तरुणाशी लग्न करून संपूर्ण कुटुंबाला समाजासमोर अपमानित केले आहे, असे नातेवाइकांनी सांगितले. आता तिच्या कुटुंबासाठी तिच्या जिवंत राहण्याचा कसलाही अर्थ उरला नाही, अनामिकाच्या या कृतीने संपूर्ण कुटुंबाची स्वप्ने भंगली.

हिंदू संघटनांनीही लग्नाआधी या प्रकरणाचा निषेध करत पोलिसात तक्रार दाखल केली होती, तसेच या प्रकरणाचा संबंध लव्ह जिहादशी जोडला होता, मात्र तपासानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात मुस्लिम तरुणाला क्लीन चिट दिली होती.