बाळासाहेब सांगायचे आंदोलन करताय तर आत जायची पण तयारी ठेवा – परब 

मुंबई – भोंग्याच्या (Loudspeaker) मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray)  पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)  यांना पत्र लिहून आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. राज ठाकरेंनी ट्विट (Tweet) करत उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही, असा इशारा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना या पत्रातून दिला आहे.

त्यानंतर आता यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरेंनी मविआ (MVA) सरकारकडून याहून वेगळी अपेक्षाच ठेवायला नको होती. एवढी भाबडी अपेक्षा कशी काय ठेवली ? जे सरकार लांगुलचालन करतंय, हनुमान चालिसा (Hanumaan Chalisa) म्हटल्यावर राजद्रोह लावून जेलमध्ये टाकतं त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणं चुकीचं. या सरकारविरोधात आम्ही लढतोय, त्यांनीही लढावं असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान,  प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांच्या पत्राविषयी विचारणा केली असता अनिल परब (Anil Parab) यांनी मनसेवर तोंडसुख घेतलं.ते म्हणाले,  पोलीस कारवाई होतच असते. ज्याला आंदोलन करायचं असतं, त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाबतीत हे होत असतं. त्यामुळे सत्तेचा जाणून-बुजून वापर कुणी करत नाही. विरोधातल्या राजकीय पक्षांना या सगळ्या गोष्टींना सामाोरं जावं लागतं. त्यामुळे सत्तेचा गैरवापर किंवा अंत पाहाणं हा विषय तसाही येत नाही, असं अनिल परब म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरेंच्या पत्रावर मनसेला काय सांगाल, असं माध्यम प्रतिनिधींनी विचारताच अनिल परब म्हणाले, “मनसेला आवाहन करणारा मी कोण आहे ? मी माझ्या पक्षाबद्दल बोलू शकतो. बाळासाहेब नेहमी सांगायचे की आंदोलन करत आहात तर दोन दिवस आतमध्ये जाण्याचीही तयारी ठेवा. ती तयारी ठेऊनच आम्ही आंदोलनं करायचो. अशा बऱ्याच आंदोलनांच्या वेळी आम्ही आतमध्ये जाऊन आलो आहे.