‘केजरीवालांना पवार, तटकरे, भुजबळ, ठाकरे ह्या सारख्या लोकांबरोबर बघून तळ पायाची आग मस्तकाला गेली’

मुंबई :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान (Bhagwant Maan Singh) यांनी आधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि नुकतीच  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. मात्र या भेटीमुळे अरविंद केजरीवाल हे टीकेचे धनी बनले आहेत. कारण एकेकाळी शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे केजरीवाल आज त्यांच्याच दारात पाठींबा मागण्यासाठी गेल्याचे चित्र पाहायला मिळाल्याने केजरीवाल यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी देखील या मुद्द्यावरून केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, 2012 साली ‘इंडिया अगेन्स्ट करपशन ‘ म्हणजेच भ्रष्टाचाराविरुद्ध जनआंदोलनाची सुरुवात झाली. माझ्यासारख्या असंख्य लोकांनी आपले तन मन धन वाहून स्वतःला ह्यात झोकून दिलं. कित्येक कार्यकर्त्यांनी आपली करियरची वाट लावून देश भ्रष्टाचार मुक्त व्हावा म्हणुन लढले. पण तेच अरविंद केजरीवाल आज शरद पवार, अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ व उद्धव ठाकरे ह्या सारख्या लोकांबरोबर बघून तळ पायाची आग मस्तकाला गेली. अशा गलिच्छ व संधीसाधू राजकारणापासून मी दूर आहे आणि मरे पर्यंत राहीन. आपल्या तत्त्वांना जपून. असं दमानिया यांनी म्हटले आहे.