ऐतिहासिक भारत जोडो यात्रेचा वर्धापनदिन नवीन पिढीला प्रेरणा देणारा – नाना पटोले

Nana Patole: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा काढून इतिहास घडवला आहे. देशातील वातावरण बदलण्याचे काम या पदयात्रेमुळे झाले. जनतेचे दुःख, समस्या, वेदना ऐकून घेणारा देशात एकमेव व्यक्ती असून तो राहुल गांधी यांच्या रुपाने जनतेला भेटला याचे सर्वसामान्य जनतेने मोठ्या मनाने स्वागत केले. दहशतीच्या सावटाखाली असलेल्या जम्मू काश्मीरमध्येही जनतेने राहुल गांधींचे केलेले उत्स्फूर्त व भव्य स्वागत जगाने पाहिले आहे. भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) वर्धापन दिन देशभर उत्साहात साजरा होत आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी तसेच नवीन पिढीसाठी हा दिवस प्रेरणा देणारा आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

भारत जोडो यात्रेच्या वर्धापन दिनानिमित्त देशभर पदयात्रा, पत्रकार परिषदा व जाहीर सभा घेण्यात आल्या. नागपूर येथे नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले, यावेळी पटोले म्हणाले की, भारत जोडो यात्रेवर सुरुवातीला विरोधकांनी भरपूर टीका केली पण जनतने मात्र या यात्रेचे मोठे स्वागत केले. राहुल गांधी आपल्या भागात येऊन पायी चालत आहेत, आपल्याशी संवाद साधत आहेत ही भावनाच सर्वसामान्य जनतेच्या मनाला सुखावून गेली. देशात आपले कोणीतरी ऐकणारा आहे ही भावना फार मोठी व महत्वाची आहे. राहुल गांधी यांनी समाजातील सर्व घटकांच्या व्यथा, वेदना, समस्या जाणून घेतल्या. भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. या यात्रेच्या वर्धापन दिन देशभर विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

महाराष्ट्रात ३ सप्टेंबर पासून जनसंवाद पद यात्रा सुरु आहे. शहर, तालुका, गाव पातळीवर ही यात्रा सुरु असून १२ सप्टेंबर पर्यंत जनसंवाद पद यात्रा सुरु राहणार आहे. जनसंवाद पद यात्रेदरम्यान जनतेच्या समस्या जाणून घेतल्या जात आहोत. देशात व राज्यातील अत्याचारी, अन्यायी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. महागाईने कळस गाठला आहे, तरुणांना नोकरीच्या नावाखाली सरकारच लुटत आहे, शेतकऱ्यांवर आस्मानी सुलतानी संकट आहे. यामुळे शेतकरी, तरुण, महिला यांच्यात आत्महत्येचे प्रमाण वाढत असून ही चिंतेची बाब आहे. सरकारला जनतेच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही, ते फक्त सत्तेची मलई खाण्यात व्यस्त आहेत, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

या पत्रकार परिषदेला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतिश चतुर्वेदी, नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री व नागपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार अभिजित वंजारी व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे,आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

SBI Recruitment 2023: स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी, पगार 47,900 रुपयांपर्यंत असणार

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख; अवघ्या १४ महिन्यात १३,००० हुन अधिक रुग्णांना ११२ कोटी १२ लाखांची मदत वितरित