तृणमूल काँग्रेस हा पोलिटिकल जिहाद राबवणारा पक्ष – भाजपा

पणजी – पश्चिम बंगालमध्ये पंधरा वर्षे तृणमूल पक्षाचे सरकार आहे. देशातील सर्वात जास्त गरिबी या राज्यात आहे. तेथे एकही योजना न राबवता गोव्यातील सत्ता प्राप्त करण्यासाठी एका विशिष्ट समाजाला पुढे करून तृणमूल कॉंग्रेस गोव्यात जिहादी राजकारण करत असल्याचे टीका भाजपाचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी केली.

पणजी येथील कार्यालयात बोलताना कुंकळ्येकर म्हणाले की, तृणमूल काँग्रेस हा पोलिटिकल जिहाद राबवणारा पक्ष असून त्याला अनेक नेते बळी पडले. लवू मामलेदार एडवोकेट यतीश नाईक यांच्यासारख्यांना सत्य परिस्थिती कळल्यानंतर त्या पक्षातून ते बाहेर पडले. आलेक्स रेजीनाल्ड सारख्या नेत्याची स्थिती या पक्षाने ना घर का ना घाट का अशी केली.

स्वतःच्या राज्यामध्ये एकही योजना न राबवणारा पक्ष गोव्यातील लोकांना मात्र ५० हजार घरे व इतर सवलती देण्याची घोषणा जाहिरनाम्यात करतोय. त्यांनी स्वतःच्या राज्यात या योजना का जाहीर केल्या नाहीत ? याचा खुलासा अगोदर त्यांनी करणे गरजेचे आहे. आणि ही ५० हजार घरे रोहिंग्यासाठी की पश्चिम बंगालमधील घुसखोरासाठी बांधली जाणार आहेत ? त्याचाही खुलासा या पक्षाने करावा असे कुंकळ्येकर म्हणाले.

गोव्यात चांगला इतिहास आहे असा भाऊसाहेब बांदोडकर यांचा मगो पक्ष तृणमूलच्या या जिहादी राजकारणाला बळी पडल्याची खंत यावेळी कुंकळ्येकर यांनी व्यक्त केली. व गोवेकर हुशार असून या पक्षाने जो जाहीरनामा जाहीर केला आहे त्यावर गोवेकर विश्वास ठेवणार नसल्याचा दावा कुंकळ्येकर यांनी यावेळी केला.