ब्रिटीश सत्ता काँग्रेसमुक्त भारत करु शकली नाही, नरेंद्र मोदी काय करणार?:-  राहुल गांधी

अदानीच्या पैशाने काँग्रेसला हरवण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी पहात आहेत.

Rahul Gandhi – अदानीच्या पैशाने काँग्रेसला हरवण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी पहात आहेत. काँग्रेसमुक्त भारत करण्याचे स्वप्न ते पहात आहेत पण जगात एकवेळ सर्वात शक्तीशाली ब्रिटीश सत्ता होती, ती ब्रिटिश सत्ता काँग्रेसला संपवू शकली नाही, काँग्रेस पक्षानेच सर्वशक्तीमान ब्रिटीशांना देशातून पळवून लावले तिथे नरेंद्र मोदी काय काँग्रेसमुक्त भारत करणार? असा हल्लाबोल काँग्रेस नेते खा. राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी भाजपावर केला.

काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राहुल  गांधी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राहुलजी गांधी यांनी भाजपच्या विद्वेषी राजकारणाचा खरपूस समाचार घेतला. राहुलजी गांधी पुढे म्हणाले की, जगातील दोन मोठ्या वर्तमानपत्रांनी अदानीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. भारतातून १ बिलीयन डॉलर परदेशात गेले व तो पैसा पुन्हा भारतात गुंतवून अदानीने भरपूर संपत्ती कमावली. या संपत्तीतूनच अदानीने देशातील विमानतळ, रेल्वे, खाणी, वीज, बँका विमा कंपन्या विकत घेतल्या. आता अदानी धारावीला संपवण्याचे काम करत आहेत पण त्यांना धारावी समजलेली नाही.

काँग्रेस पक्ष धारावी संपवू देणार नाही. गरिबांचा हिंदुस्थान संपवण्याचे मोदींचे स्वप्न काँग्रेस पूर्ण होऊ देणार नाही. काँग्रेस पक्षात दम नाही असे म्हणतात मग कर्नाटकात भाजपाचा सफाया कोणी केला? महाराष्ट्रातूही भाजपाचा पराभव होणार आहे, तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशमधूनही भाजपा पराभव होणार असून त्यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षच भाजपला पराभूत करून विजयी होणार आहे. मोदी सरकारने कितीही यंत्रणा कामाला लावू दे, काहीही करु देत काँग्रेस पक्षाला कोणीही रोखू शकत नाही. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष मजबूत आहे कारण काँग्रेस पक्ष विचारधारेचा पक्ष आहे, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कोणालाही घाबरत नाही.

यावेळी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, मोदी व त्यांच्या लोकांनी कटकारस्थान करून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. राहुल गांधी सातत्याने गरिबांचा आवाज उठवत होते, बेरोजगारीवर आवाज उठवत होते, मोदींविरुद्ध आवाज उठवत होते म्हणून त्यांचा आवाज बंद करण्यासाठी खासदारकी रद्द करण्यात आली पण राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करावी लागली. संसदेत येताच राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारच्या गैर कारभारावर तुफानी हल्लाबोल केला. मोदी दिल्लीहून कर्नाटकात येऊन गल्लीबोळात फिरले पण कर्नाटकची जनता भुलथापांना कोणी बळी पडली नाही. आपण सर्वजण एक होऊन लढलो तर कोणीही आपला पराभव करु शकत नाही.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आहे, राहुल गांधी यांनी टिळक भवनला भेट दिली आहे. महाराष्ट्र नेहमीच काँग्रेस विचाराचा राहिलेला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष विजयी झाला पाहिजे असे सोनियाजी गांधी यांनी सांगितले होते व त्यांना मी शब्द दिला आहे की  महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसला विजयी करेन. मी आपल्याला खात्रीने सांगतो की आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजयी होऊन विधाभवनवर काँग्रेसचाच तिरंगा फडकेल.

यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री व काँग्रेस कार्य समितीचे सदस्य चंद्रकांत हंडोरे, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य राज्यसभा खासदार काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य गुरुदीप सप्पल, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, बसवराज पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार अमरजितसिंह मन्हास, माजी मंत्री विश्वजीत कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत,  महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख,  मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार यांच्यासह वरिष्ठ नेते व आमदार पदाधिकारी उपस्थित होते.

येथे वाचा आणखी बातम्या-

Jalna Lathicharge Case : सुप्रिया ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका; चित्रा वाघ यांची विनंती

Maratha Reservation : आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी – शिंदे

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; शरद पवारांनी सांगितलं याला नेमकं कोण आहे जबाबदार

Jalna Lathicharge Case : राज ठाकरेंनी सरकारला झाप झाप झापलं; मराठा समाजाला केले ‘हे’ आवाहन