एमपीएससीच्या महिला उमेदवारांना पूर्वीचेच शारीरिक निकष लावा – ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई – एमपीएससी स्पर्धा (MPSC) परीक्षेत महिला उमेदवारांच्या शारीरीक चाचणीसाठी नवे निकष लावण्यात आले आहेत. हे निकष त्रासदायक ठरत असून त्यातून या महिला उमेदवारांना भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे पूर्वीचेच शारीरिक निकष लावण्याची मागणी ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी विधानसभेत केली. एमपीएससीची परीक्षा देणा-या महिला उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी नवे निकष लावण्यात आले आहेत. हे निकष त्रासदायक असल्याचे काही महिला उमेदवारांनी ॲड. यशोमती ठाकूर यांना सांगितले होते. त्यामुळे एमपीएसी ची परीक्षा देणा-या महिला उमेदवारांसाठी नव्याने लागू केलेले शारीरिक निकष बदलण्याची मागणीच त्यांनी यावेळी सभागृहात केली.

माजी राज्यमंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भाग्यश्री मोकाटेवरील मोक्का विरोधात विधानभवनात उपोषण सुरू केले. याअनुषंगाने ॲड. यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत आवाज उठवला. अहमदनगर जिल्ह्यातील जेऊर इथल्या भाग्यश्री मोकाटे या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थीनीवर मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भाग्यश्री अवघ्या २२ वर्षांची आहे. हा गुन्हा नोंद होऊन तीन वर्षे झाली आहेत. त्यामुळे आमदार तनपुरे आणि भाग्यश्री यांच्यासोबत चर्चा करून यातून मार्ग काढण्याची मागणी ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली. यावर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून यासंदर्भात पुनःपरीक्षण करण्याचे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

दरम्यान, याचवेळी ॲड. यशोमती ठाकूर यांनी कापूस आणि हरभरा पीकाची खरेदी लवकरात लवकर करण्याची मागणीही केली.