शेतकऱ्यांच्या उसाला समृद्धी कारखान्याचा मराठवाड्यात उच्चांकी दर : सतीश घाटगे

Sugarcane Factory : गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला घनसावंगी तालुक्यातील समृद्धी साखर कारखान्याने एफआरपी पेक्षा ११० रुपये वाढीव मोबदला देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये अंबड –घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला मराठवाड्यात उच्चांकी दर देणारा साखर कारखाना म्हणून समृद्धी कारखाना आघाडीवर राहीला आहे. समृद्धी कारखान्याचे व्हाईस चेअमरन महेंद्र मेठी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना ११० रुपये बोनस देण्याचा निर्णय झाल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी गुरुवारी घनसावंगी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला समृद्धी कारखान्याने सुरुवातीला २ हजार ३०० रुपये प्रती मेट्रिक टन या प्रमाणे पहिला हप्ता दिला. त्यानंतर शेतकऱ्यांना २०० रुपये प्रति मे.टन प्रमाणे वाढीव दुसरा हप्ता वितरीत करण्यात आला. बैलपोळा सणावर दुष्काळाचे सावट असल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. या महत्वाच्या सणासाठी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व संचालक मंडळाने सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उसाचा वाढीव तिसरा हप्ता देण्याचा निर्णय घेतला. हा वाढीव हप्ता १०० रुपये प्रती मे.टन याप्रमाणे देण्यात आला.अशा प्रकारे समृद्धी कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या उसाला आतापर्यंत २ हजार ६०० रुपये प्रती टन एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे. दरम्यान गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप झालेल्या उसास केंद्र सरकारने २ हजार ६९० रुपये प्रती मेट्रीक टन एफआरपी रक्कम निश्चीत केलेली असताना समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व सर्व संचालक मंडळाने एफआरपी पेक्षा ११० रुपये अधिक बोनस म्हणून शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ही अधिकची बोनस रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे नियोजन लवकरच करण्यात येणार असून, मागीलवर्षी समृद्धी कारखान्यास ऊस गाळपास देणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांना त्यांचा नोंदणीकृत ऊस यावर्षीही समृद्धी कारखान्यास गाळपास देणे अनिवार्य असणार आहे. दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संचालक मंडळाने हा निर्णय घेतला असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव बोबडे, डॉ. रमेश तारगे, समृद्धी कारखान्याचे संचालक दिलीप फलके, रणजीत उढाण, विकास शिंदे, अभिजित उढाण, बाबा उढाण, विष्णू जाधव, बाबासाहेब हरबक आदींची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवणारा पहिला साखर कारखाना
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नात कन्यादान म्हणून एक क्विंटल साखर मोफत घरपोच देणारा समृद्धी कारखाना महाराष्‍ट्रातील पहिला साखर कारखाना आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असलेले शेतरस्ते खुले करुन देण्याची मोहिम स्वखर्चातून कारखाना राबवत असून, आातापर्यंत १७५ किमी चे रस्ते कारखान्याने खुले करून दिले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वखर्चातून शेतकऱ्यांचे रस्ते तयार करून दिल्यामुळे समृद्धी साखर कारखाना मराठवाड्यात प्रसिद्ध आहे.

विहीर खोदण्यासाठी ५० टक्के अर्थसहाय्य
शेतकऱ्यांची शेती जलसमृद्ध करण्यासाठी समृद्धी कारखान्याने ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी पन्नास टक्के अर्थसहाय्य देणारी योजना सुरु केली आहे. या योजनेत पन्नास टक्के हिस्सा शेतकऱ्यांचा असणार आहे. तर पन्नास टक्के अर्थसहाय्य समृद्धी कारखाना देत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीत सिंचन सुविधा असल्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकत नाही. म्हणून ही योजना समृद्धी कारखान्याने सुरु केली आहे.

https://youtu.be/FA8bsQpyrSM?si=LGgNkLbw7xLVtJ7f

महत्त्वाच्या बातम्या-
चंद्रयान करिता साहित्य बारामतीतून जाणे हे अभिमानास्पद बाब – MP Supriya Sule
बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार; Boys-4मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी
महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती