‘राजकारणात व्हत्याच न्हवतं करण्याची शरद पवार यांच्यात धमक आहे’

पुणे : आपले देशी खेळ आणि खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी भरीव काम केले आहे. खेळाडूंचा आत्मसन्मान जाणणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. ‘आधारस्तंभ’ हे कॉफी टेबल बुक हे पवार यांचे क्रीडा क्षेत्रावरील योगदान दर्शवते या शब्दात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचा गौरव केला.

चिंतामणी ज्ञानपीठचे अध्यक्ष माजी नगरसेवक विजय उर्फ अप्पा रेणुसे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नेते शरद  पवार यांच्या क्रीडा क्षेत्रातील कारकीर्दीवर आधारित क्रीडाविश्वाचा आधारस्तंभ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन गुरुवारी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व रंग मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर होते.  याप्रसंगी व्यासपीठावर माजी  कसोटीपटू चंदू बोर्डे,  शांताराम जाधव, श्रीरंग इनामदार,आमदार चेतन तुपे, शकुंतला खटावकर, रुस्तमेहिंद अमोल बुचडे, काका पवार, ऍड. अभय छाजेड, प्रशांत जगताप, अंकुश काकडे हे उपस्थित होते.  या कॉफी टेबल बुकचे संपादन ज्येष्ठ पत्रकार पराग पोतदार आणि शिवाजी गोरे यांनी केले आहे तर मुद्रण गौतम गेलडा यांनी केले आहे .

धनंजय मुंडे म्हणाले, शरद पवार हे चालतं बोलत विश्वविद्यापीठ आहेत. अगदी ऊसतोड मजुरापासून जागतिक साखरेच्या बाजार पेठेपर्यंत आणि सुई पासून विमानापर्यंत माहिती असणारा जगाच्या पाठीवर दूरदृष्टी असलेला नेता नाही. त्यामुळेच या 82 वर्षाच्या खेळाडू सोबत कुठलाही खेळात नाद करत नाही. राजकारणात व्हत्याच न्हवतं करण्याची त्यांच्यात धमक आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांनी मोठे काम उभे केले आहे. एकाच नाही अनेक खेळांना त्यांनी प्रसिद्ध करण्याचे स्वप्न पाहिले न्हवे तर ते पूर्ण केले.

क्रिकेटपटू चंदू बोर्डे (Chandu Borde) म्हणाले, माझ्या जीवनात पवार यांचे योगदान आहे. क्रिकेटला मोठा दर्जा मिळाला त्यामागे पवार यांचेही मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळे खेळाडूंना पेन्शन सुरू केली.रुस्तुम ए हिंद  अमोल बुचडे म्हणाले, शरद पवार यांचे खेळांबद्दल व त्या क्षेत्रातील पदाधिकारी व खेळाडूंशी असलेले बॉंडिंग पाहिले. मैदानावर होणारा गेम आणि संघटनेत गेल्यावर सुरू होणार गेम  यामध्ये खेळ पुढे जाण्यासाठी संघटन मजबूत होण्यासाठी कार्यशाळा व्हायला हव्यात.

अर्जुन पुरस्कार प्राप्त कबड्डी पटू शांताराम जाधव म्हणाले, पवार राजकारणात जाणता राजा म्हणून ओळखले जातात. परंतु क्रीडा क्षेत्रात ही ते जाणते राजे आहेत. कबड्डी चा प्रचार आणि प्रसार 35 देशांमध्ये करण्याचे काम त्यांनी केलं. यासाठी मोठया प्रमाणात आर्थिक मदत केली. आज प्रो कबड्डी तुन खेळाडूंना कोट्यवधी रुपये मिळू लागले. अनेकांना चांगल्या नोकऱ्या मिळत आहे. माझ्या सारख्या झोपडपट्टीतील खेळाडू अर्जुन पुरस्कारा पर्यन्त पोहोचला.

प्रास्ताविक करताना अप्पा रेणुसे म्हणाले, माझ्या जीवनावर खेळाचा पगडा आहे. कुस्तीच्या लाल मातीमुळे माझ्या आयुष्याला भरपूर काही दिले. पवार साहेबांचे क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान आहे. क्रीडा क्षेत्रावर त्यांचे फार प्रेम आहे. खेळाडूंच्या पाठीवर आश्वासक हात त्यांनी कायम दिला. त्यांचे हे योगदान समाजा समोर यावे यातून कॉफी टेबल बुक ची संकल्पना पुढे आली. फक्त अभ्यासाने न्हवे तर क्रीडा क्षेत्रातून करिअर घडू शकते यासाठी हे बुक मार्गदर्शक ठरेल.  युवराज रेणुसे यांनी आभार प्रदर्शन केले. माजी नगरसेवक युवराज रेणुसे यांनी आभार मानले.