श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पंढरपूर, काशीच्या धर्तीवर परळी वैद्यनाथ कॉरिडॉरला मान्यता द्या – मुंडे

नागपूर   – परळी शहरातील श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र हे महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून, दरवर्षी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात, त्यांना आवश्यक पूरक सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच या अध्यात्मिक स्थळाचे जतन व्हावे व शहरासह मंदिर व परिसराचा कायापालट व्हावा यादृष्टीने पंढरपूर, काशी विश्वेश्वर, उज्जैन महाकाल या धर्तीवर परळी वैद्यनाथ कॉरिडॉर विकसित करण्यास राज्य सरकारने मान्यता द्यावी, अशी मागणी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली.

नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्यावरील चर्चेदरम्यान धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे.

परळी येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ वे ज्योतिर्लिंग असून याचे धार्मिक महत्व अनन्यसाधारण आहे मात्र मागील काही वर्षांत वैद्यनाथ धामचे नाव १२ ज्योतिर्लिंग स्थळांच्या यादीमध्ये दाखवण्यात येत असून, वैद्यनाथ धामचे नाव वगळून १२ ज्योतिर्लिंगांच्या यादीत परळीच्या प्रभू वैद्यनाथांचेच नाव पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून सर्वत्र रेकॉर्डला कायम करावे, असेही धनंजय मुंडे यांनी विधानसभेत निक्षून सांगितले.

दरम्यान परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३.५८ कोटी रुपयांचा आराखडा महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेला आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात भव्य भक्तनिवास व अन्य विकासकामे सध्या सुरू आहेत. तसेच पुढील टप्प्यातील कामांसाठी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखाड्यातील पुढील टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, याबद्दल धनंजय मुंडे यांनी राज्यसरकारचे आभार मानले.

परळी हे वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे शहर असून, महाशिवरात्रीसह विविध निमित्ताने लाखो भाविक देशभरातून येथे दर्शनासाठी  येत असतात, त्यामुळे भाविकांना पूरक सोयी-सुविधा मिळाव्यात तसेच काशी व उज्जैन कॉरिडॉरच्या धर्तीवर वैद्यनाथ मंदिर, परिसर व परळी शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी परळी वैद्यनाथ कॉरिडॉरला मान्यता देण्यात यावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राज्यसरकारच्यावतीने मंत्री उदय सामंत यांनी यावर उत्तर देताना राज्यसरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करेल, असे आश्वासन यावेळी विधानसभेत बोलताना दिले.