दोन जुळ्या बहिणींशी विवाह करणे तरुणाला पडणार महागात, महिला आयोगाकडून कारवाईचे आदेश

सोलापूर| सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे एकाच तरुणाशी मुंबईतील दोन जुळ्या बहिणींनी लग्न केल्याची अनोखी घटना घडली आहे. त्यांचा लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महाराष्ट्रभरात त्याची चर्चा आहे. या जुळ्या बहिणींना मरेपर्यंत एकत्र राहायचे असल्याने त्यांनी हा विवाह केला आहे. परंतु कायद्यानुसार असा विवाह करणे गुन्हा आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेत सोलापूर पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई येथील दोन जुळ्या आयटी इंजिनियर मुली पिंकी मिलिंद पाडगावकर आणि रिंकी मिलिंद पाडगावकर यांनी अतुल उत्तम अवताडे या तरुणाशी एकाच मंडपात लग्नगाठ बांधली आहे. तिघांनीही स्वत:च्या मर्जीने हा विवाह केला आहे. परंतु आता त्यांचा विवाह कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.

भारतीय दंड विधान 494 नुसार पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न करता येत नाही. पती किंवा पत्नी जिवंत असताना ज्याही जोडीदाराने दुसऱ्याशी लग्न केल्यास ते लग्न कायद्याने ग्राह्य धरले जात नाही. असं झाल्यास दुसरं लग्न करणाऱ्या पतीला किंवा पत्नीला सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते आणि दंड देखील होऊ शकतो.

रुपाली चाकणकर यांनीही या दंड विधानानुसार चौकशीअंती या जोडप्यावर कारवाई करण्याचे आदेश सोलापूर पोलिसांना दिले आहेत. सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494 प्रमाणे हा गुन्हा आहे. तरी सोलापुर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा, असे त्यांनी ट्वीट करून लिहिले.