भाजपला जर हेच करायचं होतं, तर 2019 ला केलं असतं तर युती तुटली असती का ? – सावंत 

मुंबई – महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री म्हणून बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा काल शपथविधी झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना राजभवनामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

दरम्यान,  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) शपथ घेणार, हाच मुळात आज पहिला धक्का राज्यासाठी अन् देशासाठी होता. पण थोड्यात वेळात शिंदेंना मुख्यमंत्री बनवून सरकारच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आले असलेल्या फडणवीसांनी (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, हा सर्वात मोठा धक्का होता.

बंडखोर शिंदेंना मुख्यमंत्री बनवून २०१९ मध्ये आपण उद्धव ठाकरेंनाही (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री बनवू शकलो असतो, असाच संदेश देत ठाकरेंना डिवचले असल्याचे बोलले जात आहे.  दरम्यान, भाजपला जर हेच करायचं होतं, तर 2019 ला केलं असं तर युती तुटली असती का, असा सवाल यांनी खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी उपस्थित केला आहे.

भाजपच्या चाणक्यांना आता हे सुचलं. त्यांना हे आधी का सूचलं नाही ? हे आधीच सूचलं असतं तर हे आज घडलं असतं का ? यामागे शिवसेनेचं खच्चीकरण करणं हा एकमेव हेतू आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्रिपदाची अडीच वर्षं पूर्ण होतील त्या दिवशी मी राजीनामा देतो, असं उद्धव ठाकरे लिहून द्यायला तयार होते. तरीसुद्धा त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असं देखील ते म्हणाले.