व्यक्ती म्हणून मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, नथुरामच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंचे स्पष्ट मत

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध होऊ लगाला आहे. हा सिनेमा महिना अखेरिस प्रदर्शित होणार आहे. मात्र, या अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या या भूमिकेनंतर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

या भूमिकेवरून आता अमोल कोल्हे यांना विरोध होत असताना त्यांनी या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले आहे. ‘२०१७ साली या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. ज्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

तर, ‘कलाकार म्हणून माझ्याकडे ही भूमिका आली होती आणि ती मी साकारली. त्या विचारधारेचा जेव्हा मी प्रचार आणि प्रसार करतो आणि माझी राजकीय विचारधारा ही वेगळी गोष्ट आहे. व्यक्ती म्हणून मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्याचा मी आदर करतो. चार पाच वर्षापूर्वी केलेला सिनेमा आहे आणि तो बाहेर आल्यानंतरच त्यामध्ये काय आहे हे मला कळणार आहे. माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. कलाकार आणि राजकीय प्रतिमा या दोन गोष्टींची गल्लत केली जाऊ नये अशी माझी अपेक्षा आहे,’ असं देखील अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?

अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते असे त्यांनी म्हटले आहे.

30 जानेवारी 1948 या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली होती. दरम्यान, 30 जानेवारी या दिवसाचा धागा पकडत येत्या 30 तारखेलाच हा सिनेमाता प्रदर्शित होणार आहे. 30 जानेवारी, 2022 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळू शकेल.