अमोल कोल्हेंच्या नथुरामच्या भूमिकेवर राजेश टोपेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध होऊ लगाला आहे. हा सिनेमा महिना अखेरिस प्रदर्शित होणार आहे. मात्र, या अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या या भूमिकेनंतर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अमोल कोल्हेंच्या या भूमिकेचे समर्थन केले आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा 45 मिनिटाचा सिनेमा आहे. तो प्रदर्शित होत आहे असं मला समजलं. अमोल कोल्हे आज मला भेटले. तासभर आमची चर्चा झाली. ते पुण्यात एक प्रकल्प राबवत आहे. त्यावर चर्चा झाली. त्यांनी मला एक क्लिप दाखवली. त्यात ते गोडसेची भूमिका साकारत आहेत. अमोल कोल्हेंची खरी ओळख ही अभिनेता म्हणून आहे. ते लोकप्रिय आणि गुणी अभिनेते आहेत. अभिमान वाटावा असे कलाकार आहेत. त्यांची संभाजी मालिका सर्वजण पाहात असतात. अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. गोडसेंचा रोल केला असला तरी अभिनेत्याच्या अँगलने त्याकडे पाहिलं पाहिजे. ते कलावंत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कलेच्या भूमिकेतून पाहा, असं आवाहन टोपे यांनी केलं.

कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?

अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते असे त्यांनी म्हटले आहे.

30 जानेवारी 1948 या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली होती. दरम्यान, 30 जानेवारी या दिवसाचा धागा पकडत येत्या 30 तारखेलाच हा सिनेमाता प्रदर्शित होणार आहे. 30 जानेवारी, 2022 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळू शकेल.