पोलिसांनी बळाचा वापर करून पहिलवानांना घेतलं ताब्यात, जंतर-मंतरवरील कुस्तीपटूंचे तंबूही हटवले

नवी दिल्ली – नव्या संसद भवनाचं रविवारी ( २८ मे ) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झालं. दुसरीकडं नवीन संसद भवनाच्या समोर धडकू पाहणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. पण, ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीकरत कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कुस्तीपटूंनी जंतर-मंतर ते नवे संसद भवन अशा मार्चचं आयोजन केलं होतं.

विशेष म्हणजे दिल्लीत ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या निषेधार्थ कुस्तीपटूंनी ‘महिला सन्मान महापंचायत’ बोलावली होती. आता पैलवानांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी जंतरमंतरवरून तंबूही उखडून टाकले.कुस्तीपटूंना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला होता. ठिकठिकाणी बॅरिकेडिंगही लावण्यात आले होते.

दीपेंद्र पाठक, विशेष सीपी (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणाले, “त्यांनी बॅरिकेड्स तोडले आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही. त्यांनी कायदा मोडला, म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आले. कुस्तीपटूंना वेगवेगळ्या अज्ञात ठिकाणी नेल्यानंतर लगेचच, पोलीस अधिकार्‍यांनी पैलवानांच्या खाटा, गाद्या, कुलर, पंखे आणि ताडपत्री छत यासह इतर गोष्टी काढून निषेधाची जागा साफ करण्यास सुरुवात केली.