सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीने पाठवलेली नोटीस राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई – कॉंग्रेस 

शिर्डी / मुंबई  – अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सोनिया गांधी आणि राहुल गांधी (Sonia Gandhi and Rahul Gandhi)  यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे.   नॅशनल हेराल्ड (National Herald)  प्रकरणासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर आता सोनिया आणि राहुल 8 जून रोजी ईडी अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने भाजपवर टीका केली आहे.  काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांना ईडीने पाठवलेली नोटीस राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. देशात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार कारभार मात्र हुकूमशाहीपद्धतीने करत आहे. ईडीच्या या नोटीसीचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत असून अशा कारवायांना काँग्रेस भिक घालत नाही असे प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले आहे.

शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित नवसंकल्प कार्यशाळेत पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आ. अमर राजूरकर, आमदार संग्राम थोपटे, आ. अमित झनक, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते.