भारतच ‘आशियाचा किंग’! फायनलमध्ये श्रीलंकेवर सोपा विजय; रेणुका, स्म्रीतीची चमकदार कामगिरी

आशिया चषक (Asia Cup), या क्रिकेट स्पर्धेवर नेहमीच भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे. केवळ पुरुष संघच नव्हे तर भारताच्या महिला संघानेही आशिया चषकावर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. यंदाही भारतीय महिला संघाने (India Women Team) विजयाची ही परंपरा कायम राखत विक्रमी सातव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. आशिया चषक २०२२च्या अंतिम सामन्यात श्रीलंका महिला संघाला ८ विकेट्सने धूळ चारत भारतीय महिला संघ पुन्हा एकदा ‘आशियाचा किंग’ ठरला आहे. 

भारताच्या गोलंदाज चमकल्या 
आज (१५ ऑक्टोबर) सिल्हेट येथे श्रीलंकाविरुद्ध झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाला निर्धारित २० षटकात ९ बाद ६५ धावाच करता आल्या. दिप्ती शर्मा (Deepti Sharma), रेणुका सिंग (Renuka Singh) यांच्यासह इतर गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे भारतीय संघ श्रीलंकेला इतक्या कमी धावसंख्येवर रोखण्यात यशस्वी ठरला. श्रीलंकेकडून एकटी इनोका रनवीरा सर्वाधिक १८ धावा जोडू शकली.

तर या डावात भारताकडून दिप्ती शर्माने १.७५ च्या इकोनॉमी रेटने गोलंदाजी केली. ४ षटके फेकताना तिला एकही विकेट घेता आली नाही. मात्र तिने केवळ ७ धावा खर्च केल्या. तर रेणुका सिंग (०३ विकेट्स), राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा (प्रत्येकी ०२ विकेट्स) यांनीही प्रशंसनीय स्पेल टाकले. रेणुका सिंगला तिच्या शानदार गोलंदाजी प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

स्म्रीती मंधानाची मॅच विनिंग खेळी
श्रीलंकेच्या ६६ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर आणि संघाची उपकर्णधार स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिने दम दाखवला. केवळ २५ चेंडूत २०४ च्या स्ट्राईक रेटने तुफान फलंदाजी करताना तिने नाबाद ५१ धावा केल्या. यादरम्यान तिच्या बॅटमधून ३ षटकार व ६ चौकार निघाले. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौरने झटपट नाबाद ११ धावा जोडत ८.३ षटकातच संघाला अंतिम सामना जिंकून दिला.

भारतीय संघाने आशिया चषक जिंकण्याची ही विक्रमी सातवी वेळ होती. यापूर्वी त्यांनी २००४, २००५, २००६, २००८, २०१२ आणि २०१६ मध्ये आशिया चषकावर आपले नाव कोरले होते.