रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवास गाडीवर की बैलगाडीवर हेच मुळी नागरिकांना कळंत नाही – अलई

मुंबई – महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम रस्त्यांवरही दिसून येत आहे. खेडेगावांपासून ते शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यांवर जागोजागी जीवघेणे खड्डे झाल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रविण अलई (Pravin Alai) यांनी आवाज उठवला आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना महाराष्ट्रातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल माहिती देणारे ट्वीट केले आहे. तसेच हे खड्डे भरून काढण्याची विनंतीही केली आहे.

रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना टॅग करत प्रविण अलई यांनी लिहिले आहे की, ‘सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय, महाराष्ट्रात सर्वत्र रस्त्यांची चाळण झाली आहे, खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, प्रवास गाडीवर की बैलगाडी वर हेच मुळी नागरिकांना कळंत नाही. आपणांस विनंती की, आपण बांधकाम विभागांना विशेष आदेश करून मूळ खड्डे भरण्यास सांगा.’

दरम्यान, अनेक रस्त्यांवर नव्याने खड्डे पडले असून, यापूर्वी दुरुस्ती केलेले रस्तेही उखडू लागले आहेत. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला. मात्र ही कामेही तकलादू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे या रस्त्यांवरील असंख्य खड्ड्यांमध्ये पाणी साचते. यामुळे वाहनचालकांना खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज येत नाही यामुळे अपघात देखील घडत आहेत. विरोधक देखील या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून सरकारला ते लक्ष्य करत आहेत.

हे खड्डे वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडवून देतात. काही बेभान वाहनचालकांमुळे खड्ड्यांतील पाणी पादचा-यांच्या अंगावर उडते. अशा घटनांमुळे रस्तोरस्ती वाहनचालक व पादचा-यांमध्ये शाब्दिक चकमकी घडून येतात. सोबतच या खड्ड्यांचा नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असून अनेक नागरिकांना पाठ-मानदुखी तसेच मणक्याचे आजार झाले आहेत. निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर देखील कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.