टी२० विश्वचषकासाठी असे आहे भारताचे वेळापत्रक, पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे पहिली मॅच

उद्यापासून (१६ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियातील मैदानांवर टी२० विश्वचषक २०२२ चा (T20 World Cup 2022) थरार सुरू होत आहे. क्रिकेटवेड्या भारत देशातील चाहते आपली १५ वर्षांची विश्वविजेतेपदाची प्रतिक्षा संपवण्यासाठी देव पाण्यात घालून बसलेले दिसतील. भारतीय क्रिकेट संघही २००७ नंतर टी२० विश्वचषक जिंकण्यासाठी जीवाचे रान करताना दिसेल. मात्र याच भारतीय संघाचे टी२० विश्वचषकातील सामने कोणत्या दिवशी, कुठे आणि कोणाविरुद्ध रंगणार आहेत? थोडक्यात भारतीय संघाचे टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक (Team India’s T20 WC Schedule)कसे आहे?, हे जाणून घेऊया…

टी२० विश्वचषकातील पहिला साखळी फेरी सामना १६ ऑक्टोबरला श्रीलंका विरुद्ध नामिबिया संघात रंगणार आहे. मात्र भारतीय संघाने थेट सुपर-१२ मध्ये प्रवेश केला आहे. सुपर-१२ फेरीची सुरुवात २२ ऑक्टोबरपासून होणार आहे. भारतीय संघ टी२० विश्वचषकातील त्यांचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी कट्टर विरोधक पाकिस्तान संघाविरुद्ध खेळणार आहे. मेलबर्न येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी हा सामना सुरू होईल.

त्यानंतर २७ ऑक्टोबरला सिडनीच्या मैदानावर दुपारी १२.३० वाजता होणार आहे. परंतु या सामन्यात भारताचा प्रतिस्पर्धी संघ (ए२ संघ) कोण असेल, हे अद्याप निश्चित नाही. पुढे ३ दिवसांच्या अंतराने ३० ऑक्टोबरला भारतीय संघ त्यांचा तिसरा सुपर-१२ सामना खेळेल. पर्थ येथे बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा सामना होईल. संध्याकाळी ४.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मग ०२ नोव्हेंबरला बांगलादेश (ऍडलेड, दुपारी दीड) आणि ०६ नोव्हेंबरला बी२ संघाविरुद्ध ((मेलबर्न, दुपारी दीड) भारतीय संघ दोन हात करेल.