रायगड समुद्र किनाऱ्यावरची बोट ऑस्ट्रेलियन महिलेची, इकडे कशी आली? देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ माहिती 

रायगड – रायगड (Raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यावर हरिहरेश्वर (Harihareshwar) येथे सापडलेली बोट ओमान सिक्युरिटीची असल्याची माहिती हाती आली आहे. आज दुपारी हरिहरेश्वर समुद्राच्या किनारी संशयित बोट आल्याने एकच खळबळ माजली. या बोटीत कुणीही व्यक्ती नसल्याने आणखीच भीती व्यक्त करण्यात आली. गंभीर बाब म्हणजे बोटीमध्ये एके-४७ रायफल्स आणि काडतुसं सापडली आहेत. तर खबरदारी म्हणून एटीएसकडून दहशतवादी कनेक्शनबाबत तपास सुरु करण्यात आलाय.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेमध्ये याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. रायगडच्या हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर एक बोट दुर्घटना अवस्थेत सापडली आहे. या बोटीत 3 AK-47 आणि काडतुसं सापडली. या बोटीचं नाव लेडी हान आहे, तसंच ही बोट ऑस्ट्रेलियन आहे. ऑस्ट्रेलियन महिलेची ही बोट असून या बोटचा कॅप्टन महिलेचाच नवरा आहे. एका कोरियन युद्ध नौकेने त्याला मदत केली आहे. ही बोट मस्कतवरून युरोपला जात होती, असं फडणवीस म्हणाले.

दिनांक 26- 6- 2022 रोजी सकाळी 10 च्या सुमारास या बोटीचे इंजिन निकामी झाले. खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. त्याच दिवशी दुपारी 1 वाजेच्या सुमारास एका कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली. त्यांना ओमानला सुपूर्द केले.समुद्र खवळलेला असल्याने लेडी हान या बोटीचे टोइंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्याला लागलेली आहे. अशी माहिती भारतीय कोस्टगार्डकडून प्राप्त झालेली आहे.स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक या घटनेचा तपास करत आहेत. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती फडणवीस यांनी दिली.