शरद पवारांचा चेहरा म्हशीच्या…; मनसेचं थेट खटक्यावर बोट 

पालघर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये घेतलेल्या ‘उत्तर’ सभेमध्ये केलेल्या चौफेर फटकेबाजीवरून आता राज्यातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. ठाण्यामध्ये बोलताना राज ठाकरेंनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्यातील आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोचक शब्दांत टोलेबाजी केली आहे.

राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांची नक्कल करत त्यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टोले लगावले. “यांची बाजू घेणारे इकडचे आव्हाड. काय पण चेहरा आहे.. नागानं फणा काढावा, असा चेहरा आहे. उद्या काहीतरी म्हणेलच, डसू शकतो वगैरे.. ये.. शेपूट धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो. असं ठाकरे म्हणाले होते.

यावर प्रत्युत्तर देताना आव्हाड म्हणाले, माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे असं जर तुम्ही म्हणाल तर मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे हे म्हणावं का? तो भाग कोणता हे महाराष्ट्र ओळखतो,” असं प्रत्युत्तर आव्हाडांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं.

दरम्यान, आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी शेलक्या शब्दात आव्हाड यांचा समाचार घेतला आहे. “मला वाटतं त्यांनी चेहऱ्यावर टीका करण्याआधी त्यांच्या नेत्याचा चेहरा पहावा आणि आम्हाला सांगावं की म्हशीच्या कुठल्या भागासारखा त्यांचा चेहरा दिसतो. पण आम्ही असं म्हणणार नाही पवारसाहेबांबद्दल आम्हाला आदर आहे. पण त्यांनी टीका करताना तारतम्य पाळावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे,” असं अविनाश जाधव म्हणाले. “फुकट तुम्ही पत्रकार परिषदेत तत्वाच्या गोष्टी करता. नंतर अचानक तुम्ही काहीही बडबडता. हे बरोबर नाहीय,” असं जाधव म्हणालेत.