‘अधिकाऱ्यांना घरबसल्या पोसून शिंदे – फडणवीस सरकार अक्षरशः जनतेच्या पैशाचा चुराडा करतेय…’

मुंबई  – महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विकासकामे रोखण्याच्या निर्णयांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असून शिंदे-फडणवीस सरकारला दणका दिला असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे.

शिंदे – फडणवीस सरकारचा कारभार नियोजनशून्य होता हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत असे सांगतानाच महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय आणि विकासकामे रद्द करण्याचा सपाटा शिंदे – फडणवीस सरकारने लावला होता मात्र मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारचे निर्णय योग्यच होते हे सिद्ध झाले आहे असेही महेश तपासे म्हणाले.

तर दुसरीकडे ५०० अधिकार्‍यांना पाच महिने नियुक्त्या न दिल्याने या अधिकाऱ्यांना घरबसल्या पोसण्याचे काम शिंदे – फडणवीस सरकार करत असून अक्षरशः जनतेच्या पैशाचा चुराडा करत असल्याचा थेट आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

विविध विभागातील ५०० अधिकारी नियुक्त्यांच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना तात्काळ नियुक्त्या दिल्या असत्या तर जनतेच्या कामांकडे त्यांनी लक्ष दिले असते परंतु असे निर्णय घेण्याऐवजी भावनिक आव्हाने, निर्णय आणि भावनिक गोष्टींवर राजकारण करण्यात शिंदे – फडणवीस सरकार व्यस्त आहे असा हल्लाबोलही महेश तपासे यांनी केला आहे.