आमच्या मार्गात आला तर आम्ही सोडणार नाही, भरत गोगावले यांचा विरोधकांना इशारा

Mumbai – आज सकाळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं.

सत्ताधारी आंदोलन करत असताना विरोधक मुद्दाम त्यांच्या मध्ये गेले ज्यामुळे दोन्ही गटामध्ये मोठा वाद झाला. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली.दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

हा गोंधळ घडला त्यावेळी तिथं उपस्थित असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, आमच्यावर विरोधक आरोप करत होते. आता आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यासाठी पायऱ्यावर आंदोलन केलं. आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, असं ते म्हणाले. आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्या आत कुणी येऊ नये, असं गोगावले म्हणाले. आमच्या मार्गात आलं तर आम्ही सोडणार नाही, असं ते म्हणाले. त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, असंही गोगावले म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरफोक नाहीत, असं ते म्हणाले.