अरे हाड! ते काय आम्हाला धक्काबुक्की करणार, आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली – गोगावले 

Mumbai – आज सकाळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं.

सत्ताधारी आंदोलन करत असताना विरोधक मुद्दाम त्यांच्या मध्ये गेले ज्यामुळे दोन्ही गटामध्ये मोठा वाद झाला. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी गाजराच्या माळा घेऊन पायर्‍यांवर येत घोषणाबाजी केल्याने संतप्त झालेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी विरोधी आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केला त्याचवेळी आमदार अमोल मिटकरी मध्यस्थीसाठी गेले असता आमदार महेश शिंदे यांनी धक्काबुक्की केली त्यामुळे राष्ट्रवादी आमदार आणि शिंदे गटात जोरदार धक्काबुक्की झाल्याचे चित्र पहायला मिळाले असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे.

भरत गोगावले यांची प्रतिक्रिया

आम्ही यांचा सगळा इतिहास बाहेर काढला. करोनाचा काळ, सिंचन घोटाळा, नवाब मलिक, अनिल परब यांची वस्तुस्थिती आम्ही मांडली. आमचं झाल्यानंतर पायऱ्या रिकाम्या केल्या असत्या. पण आम्ही बोलत असतानाच गोंधळ घालत लक्ष विचलित करायचं हा कोणता प्रकार आहे. आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? आम्ही जशास तसं उत्तर दिलं आहे. त्यांनी आमचा नाद करायचा नाही. कारण आम्ही कोणाला पाय लावत नाही. चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करु, पण कोणी आम्हाला पाय लावण्याचा प्रयत्न केला तर सोडणार नाही. अंगावर येईल त्याला शिंगावर घेऊ,” असा इशारा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिला आहे. हा तर फक्त ट्रेलर होता, चित्रपट अजून बाकी आहे असंही ते म्हणाले. तुम्हाला धक्काबुक्की झाली का? असं विचारलं असता ते म्हणाले “अरे हाड! ते काय आम्हाला धक्काबुक्की करणार, आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली”.