‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

Ayodhya Ram Temple, Jitendra Awhad: रामलल्लाच्या स्वागती जय्यत तयारी सुरू झाली आहे. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रमुख पाहुणे असतील. सोबतच देशभरातील अनेक मान्यवर, साधुसंत उपस्थित असतील. एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे शिर्डी येथे शिबिर आयोजित केले गेले आहे. या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उदघाटनावर बोलत असताना एक वादग्रस्त विधान केले आहे.

“राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिबिरात बोलत असताना उपस्थित केला.

या वक्तव्यावरुन जितेद्र आव्हाड टीकेचे धनी ठरले आहेत. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आव्हाडांचा समाचार घेताना म्हटले, अहो ठिक आहे, आम्ही म्हणतो राम सगळ्या विश्वाचा आहे. पण तुम्ही एकदा “सेव्ह बाबरी फेम” शरद पवारांना विचारून घेतले असते तर बरे झाले असते. त्यांना मंदीरापेक्षा बाबरी मशिदीचा चिंता जास्त होती.

तसेच भाजपानेही आव्हाडांवर टीका करताना लिहिले की, जितुद्दीन आव्हाड तुमचा जाहीर निषेध! जितुद्दीन आव्हाडांना आज चक्क प्रभू रामचंद्र आठवले. जसे आचार तसे विचार त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं दिसतो. यांना हिंदू दैवतांचा अपमान करण्यात काय धन्यता वाटते माहीत नाही. खोटा आणि सोयीचा इतिहास लिहण्याची तुम्हा लोकांची जुनी खोड रामभक्त सहन करणार नाहीत. लक्षात ठेवा वाल्यानं रामायण लिहलं नव्हतं त्यासाठी त्याला वाल्मिकी व्हावंच लागलं होतं. प्रभू रामचंद्र तुम्हाला सद्बुध्दी देवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना!

महत्वाच्या बातम्या-

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अनधिकृत अतिक्रमणे हटवली जाणार; सात दिवसांचा अल्टीमेट्म

राज्यात 45 च्या वर खासदार तुम्हाला महायुतीचे दिसतील; महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास

अमरावती लोकसभेची जागा आम्हालाच पाहिजे,नवनीत राणा यांनी…; बच्चू कडू यांचं मोठं विधान