पुरोहित वर्गाच्या आशीर्वादासह पुण्यातून राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना

पुणे –  औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी(उद्या) होणाऱ्या बहुचर्चित सभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray)  हे आज सकाळी पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले आहेत.  तत्पूर्वी ही सभा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी राज ठाकरे यांना  मंत्रोच्चाराद्वारे जवळपास १०० ते १५०  पुरोहितांकडून आशीर्वाद दिला गेला आहे. यासाठी पुण्यातील राजमहल(Rajmahal) या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी येथे सकाळीच ब्रह्मवृंद मोठ्यासंख्येने हजर राहून आशीर्वाद देत कार्यसिद्धीसाठी प्रार्थना केली.

मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. पुणे ते औरंगाबाद प्रवासात राज ठाकरेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागतही केलं जाणार आहे.

राज ठाकरे यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा असणार आहे. पुणे ते औरंगाबाद दरम्यान राज ठाकरे यांच्या जागोजागी स्वागताची तयारी मनसैनिकांनी केलीय. राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या सभेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. औरंगाबादमध्ये होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे.