भाजपने महाविकास आघाडीला लावला सुरुंग, पहिल्या पसंतीची मिळवली तब्बल १३३ मतं

मुंबई – अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीचा (Legislative Council Election) निकाल समोर आला असून  भाजपने आपल्या विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवला असून महाविकास आघाडीसाठी (MVA) हा मोठा धक्का मानला जात आहे.या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार  चंद्रकांत हंडोरे यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने (BJP) पुन्हा आघाडीला तडाखा दिला आहे. कॉंग्रेससह (Congress)  महाविकास आघाडीने पूर्ण ताकत लावून सुद्धा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अचूक नियोजनामुळे कॉंग्रेसच्या उमेदवाराला  विजय मिळवता आला नाही. भाजपच्या प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मिळवलेला विजय भाजपसाठी आत्मविश्वास वाढवणारा तर महाविकास आघाडीसाठी आत्मपरीक्षण करण्यासाठी भाग पाडणारा आहे.

महाविकास आघाडीची तब्बल २० मत फोडत भाजपचे पाचव्या क्रमांकाचे उमेदवार प्रसाद लाडही विजयी झाले आहेत. लाड यांना पहिल्या फेरीत १७ मत मिळाली. तर दुसऱ्या फेरीत भाजपच्या पहिल्या फेरीतील १२ मत लाड यांना ट्रान्सफर झाल्याने लाड दुसऱ्या फेरीत विजयी झाले आहेत.

सभा निवडणुकीपेक्षा आणखी १० जास्त मतं फोडून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. भाजपला पहिल्या पसंतीची एकूण १३३ मतं मिळाली आहेत. भाजप आणि त्यांच्या गोटातील लहान पक्ष व अपक्षांचे कागदावरील एकूण संख्याबळ हे ११३ इतके आहे. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत भाजपने १३३ मतं मिळवल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.