गडकरींच्या खासदार क्रिडा महोत्सवात राडा; भाजप नेत्याच्या मुलाची पंच, आयोजकांना मारहाण

Nagpur – नागपुरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने महोत्सवाच्या पंच आणि आयोजकांनाच मारहाण केली आहे. यादव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे कट्टर समर्थक आहेत. या संदर्भात पंचांनी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांच्याकडेही तक्रार केली होती. मात्र कुठलीही कारवाई झाली नसल्याने पंचांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती चौकात खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत खामला इलेव्हन आणि स्टार इलेव्हन या दोन संघामध्ये सामना होता. यातील एका संघात मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन आणि करन हे दोघेही खेळत होते. सामना सुरु असताना अर्जुनने थ्रो बॉलच्या मुद्द्यावरुन पंचांशी वाद घालायला सुरुवात केली. पंचांनी त्याला समजावून सांगूनही तो ऐकायला तयार नव्हता. अर्जुनने रागाच्या भरात ग्राऊंडवरच गोंधळ घालायला सुरुवात केली. तरीही पंचांनी हा निर्णय मागे घेण्यास नकार दिल्याने त्याने भर मैदानात प्रेक्षकांसमोरच पंचांना आणि आयोजकांना मारहाण केली.