पवारसाहेब तुमच्या सारख्यांचा निकाल लावण्याचा ठाम इरादा देशाच्या जनेतेने केलाय; भाजप नेत्याचा टोला

मुंबई: गुजरातची निवडणूक (Gujrat Election Results) एकतर्फी होईल यामध्ये कोणाच्या मनात शंका नव्हती. सगळी देशाची सत्ता त्यासाठी वापरण्यात आली. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेण्यात आले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे येतील याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम गुजरातमध्ये एकतर्फी निकाल लागणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. गुजरात निकाल लागला म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही. गुजरातचा निकाल म्हणजे देशाचा निकाल नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केली.

शरद पवार यांच्या या वक्तव्यावर भाजपाचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २०२४ मध्येही देशाचा निकाल असाच लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांचा निकाल लावण्याचा ठाम इरादा देशाच्या जनेतेने केलाय, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

“साडे तीन ‘जिल्हे’इलाही” पवारसाहेब २०२४ मध्ये देशाचा निकालही असाच लागणार, कारण तुमच्या सारख्यांचा निकाल लावण्याचा ठाम इरादा देशाच्या जनतेने केलाय, असे ट्वीटमध्ये अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.