‘१८ जानेवारीला ठाकरे सरकारचे थोबाड परत एकदा सर्वोच्च न्यायालयात फुटणार…’

मुंबई – महाराष्ट्रात भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन झालं. नागपूरमध्ये पार पडलेल्या अधिवेशनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले होते. याविरोधात निलंबित आमदारांनी न्यायालयात धाव घेतली.

आता याचिकेवरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे भाजपाच्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळण्याची शक्यता तयार झालीय. या याचिकेवर १८ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने आमदारांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत. आमदारांचं निलंबन हा सर्वस्वी सभागृहाचा निर्णय आहे. मात्र जरी असे असले तरी देखील आमदारांचे साठ दिवसांपेक्षा अधिक काळासाठी निलंबन करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारावर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,पुढच्या सुनावणीच्या वेळी म्हणजे १८ जानेवारीला ठाकरे सरकारचे थोबाड परत एकदा सर्वोच्च न्यायालयात फुटणार… असं म्हणत ठाकरे सरकारला चिमटा काढला आहे.