व्लादिमिर पुतीन यांना मोदींचा फोन, ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरधवनीवरून संवाद साधला. पुतीन यांच्या नुकत्याच झालेल्या भारतभेटीदरम्यान चर्चिल्या गेलेल्या काही मुद्द्यांवर आज उभय नेत्यांनी पुढची चर्चा केली. या मुद्द्यांवर पुढील कृतीची दिशा पक्की करण्यासाठी आजच्या संवादाचा उपयोग होणार आहे.

संरक्षण सहकार्य, खतांच्या पुरवठ्यासाठी सहकार्य, रशियाच्या अतिपूर्वेकडील भागासाठी भारताचा सहभाग आदी मुद्द्यांचा यात समावेश होता. काही आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर उभय नेत्यांनी विचारांची देवाणघेवाण केली.

भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त सामरिक भागीदारी अंतर्गत येणाऱ्या सर्व मुद्द्यांविषयी सातत्याने संपर्कात राहण्यास उभय नेत्यांनी सहमती दर्शवली. तसेच द्विपक्षीय सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यास, बहुपक्षीय विषयांमध्ये सल्लामसलत आणि समन्वय वाढविण्यासही त्यांनी मान्यता दिली.